नवी दिल्ली - किरकोळ बाजारात (रिटेल मार्केट) वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजला धक्का बसला आहे. सिंगापूरमधील लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील २४ हजार ७१३ कोटी रुपयांच्या सौद्याला स्थगिती दिली आहे.
फ्युचर ग्रुपने रिलायन्सशी २४ हजार ७१३ कोटींचा सौदा करताना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करत अॅमेझॉन कंपनीने सिंगापूरमधील लवादाकडे तक्रार केली आहे. या लवादाच्या न्यायाधीशांनी अॅमेझॉनला तात्पुरता दिलासा देत रिलायन्सचा सौदा स्थगित करण्याचा निकाल दिला आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनला रिटेलमध्ये हिस्सा खरेदीकरता रिलायन्सकडून २० अब्ज डॉलरचा प्रस्ताव?
हा आहे अॅमेझॉनचा आक्षेप-
अॅमेझॉनने फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर कुपनमध्ये ४९ टक्के हिस्सा घेतला होता. त्यानुसार फ्युचर रिटेलचा हिस्सा घेताना ३ ते १० वर्षांपर्यंत अॅमेझॉनला प्राधान्य मिळावे, अशी करारात अट होती. फ्युचर कुपनचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. मात्र, फ्युचर ग्रुपने करार करत रिटेलचा घाऊक, किरकोळ व लॉजिस्टिक्सचा व्यवसाय रिलायन्सला दिला आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये जागतिक कंपन्यांकडून गुंतवणूक
अद्याप, रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या व्यवहाराला भारतीय नियामक संस्थेकडून परवानगी मिळालेली नाही. रिलायन्स फ्युचर ग्रुप विकत घेतल्यानंतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए कंपन्यांनी ३७ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, अॅमेझॉन ही रिलायन्स रिटेलची स्पर्धक कंपनी असल्याने यापुढे काय होणार याकडे उद्योगजगताचे लक्ष लागलेले आहे.