नवी दिल्ली - अॅमेझॉनने तमिळ, कन्नडपाठोपाठ मराठीतही विक्रेत्यांना व्यवसायाची नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना ऑनलाईन व्यवसायाचे व्यवस्थापन मराठीतही करता येणार आहेत.
अॅमेझॉनवर मराठी पर्याय मिळाल्याने ८५ हजार विक्रेत्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रातून नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर आणि जळगावमधील विक्रेते हे अॅमेझॉनवर विक्री करतात. ई-कॉमर्सवर उद्योगाचा विस्तार करण्यासाठी भारतीय एमएसएमई उद्योगांना भाषा हा प्रमुख अडथळा आहे. देशातील लाखो भारतीय आंत्रेप्रेन्युरसाठी भाषेतील अडथळा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे अॅमेझॉन कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-सरकारी आणि इतर क्रिप्टोचलन एकाचवेळी स्वतंत्रपणे चालू शकतात-आयएएमएआय
विविध भाषांमध्ये व्हाईस, व्हिडिओ आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बांधील असल्याचे अॅमेझॉन इंडियाचे संचालक (सेलिंग पार्टनर) प्रणव भसीन यांनी सांगितले. विक्रेत्यांना ऑनलाईन वेबसाईटवर चांगला अनुभव येण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा-ऐतिहासिक! शेअर बाजाराने दिवसाखेर ओलांडला ५२ हजारांचा टप्पा
अॅमेझॉनमध्ये मराठीत पर्याय देण्याची मनसेने केली होती मागणी
अॅमेझॉन या ई- कॉमर्स कंपनीच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, कंपनीने हे अशक्य असल्याचे सांगितल्याने मनसे विरुद्ध अॅमेझॉन अशी लढाई सुरू झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंपनीने तक्रार मागे घेतल्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आले आहे.
दरम्यान, नुकतेच कंपनीने हिंदी, कन्नड आणि तामिळमध्ये नोंदणीचा पर्याय विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला आहे.