नवी दिल्ली - आगामी सणाच्या मुहूर्तावर व्यवसाय वाढीसाठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने देशात नव्याने 1 हजार 125 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.
नव्या गुंतवणुकीमुळे अॅमेझॉन कंपनीला स्पर्धक कंपन्यांना आणखी टक्कर देणे शक्य होणार आहे. वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओमार्ट कंपनी आगामी सणात आक्रमकपणे बाजारपेठेत उतरणार आहे. देशातील गुंतवणुकीबाबत अॅमेझॉनने प्रतिक्रिया दिली नाही.
अॅमेझॉन कंपनीने चालू वर्षात जूनमध्ये 2 हजार 310 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. चालू वर्षात जानेवारीत कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी देशात ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. त्यामधून देशातील लघू आणि मध्यम व्यावसायिक ऑनलाईन येऊ शकतील, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला होता. अमेरिकेनंतर भारत हे अॅमेझॉनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या जिओमार्टने फ्युचअर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे.