नवी दिल्ली - अॅमेझॉन ही ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी हिंदू देवतांचा अवमानकारक वापर केल्याने पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष्य ठरली आहे. संतप्त झालेल्या नेटिझन्सने #BoycottAmazon असा टेंड्र गुरुवारी ट्विटरवर चालविला. रगसह टॉयलेट सीट कव्हरवर हिंदू देवतांचे छायाचित्रे असलेली उत्पादने ऑनलाईन उपलब्ध झाल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार घडला.
नेटिझन्सने २४ हजारांहून अधिक ट्विट करत #BoycottAmazon अॅमेझॉनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. त्याबरोबर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही टॅग केले. त्यामुळे गुरुवारी दिवसभर हा टॉपवर ट्रेंड होता. याबाबत अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले, ज्या उत्पादनांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, ती उत्पादने ऑनलाईन विक्रीतून काढण्यात आली आहेत. विक्रेत्यांनी कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. जर त्याचे पालन होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांची अॅमेझॉनमधून नोंदणी रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही अॅमेझॉनकडून असे घडले आहेत प्रकार-
२०१७ मध्ये महात्मा गांधींचे चित्र असलेली पादत्राणे अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होती. अॅमेझॉन कॅनडामध्ये भारतीय ध्वज असलेल्या पायपुसणी विक्री करण्यात येत असल्याचा प्रकारही समोर आला होता. अॅमेझॉनने भारताशी निगडीत असलेल्या बाबींचा आदर ठेवावा, असे तेव्हा केंद्र सरकारने बजावले होते. त्यानंतरही अॅमझॉनकडून अवमानकारक पद्धतीने वस्तुंची विक्री होत असल्याने नेटिझन्स संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.