बीजिंग - जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबा ग्रुपला चीनच्या नियामक संस्थांनी 2.8 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. बाजारामध्ये एकाधिकारशाही केल्याने हा दंड ठोठावल्याचे चीनच्या नियामक संस्थेने म्हटले आहे. चीनमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांच्या संपत्तीत वेगाने वाढत असताना सरकारने त्यावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे.
अलिबाबा कंपनी वित्त, आरोग्य सेवा आणि इतर संवेदनशील क्षेत्रात विस्तार करत असल्याने चीनच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर चीनमधील तंत्रज्ञान कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी चीन सरकारने प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशनने अलिबाबाने 2019 मध्ये केलेल्या विक्रीच्या 4 टक्के प्रमाणात दंड ठोठावला आहे. हा दंड 2.8 अब्ज डॉलर इतका आहे. यापूर्वी चीनने अलिबाबाची मालकी असलेल्या अँट ग्रुपचा आयपीओ आणण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मोठा धक्का बसला होता. अँट ग्रुपचा आयपीओ हा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकला असता.
हेही वाचा-लशीचा तुटवडा; भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे वाढविणार उत्पादन
अलिबाबा कंपनीचा विविध क्षेत्रामध्ये विस्तार
जॅक मा हे चीनमधील सर्वाधिक श्रीमंत आणि महत्त्वाचे आंत्रेप्रेन्युअर आहेत. गतवर्षी त्यांनी नोव्हेंबरमध्ये चीन सरकारवर जाहीर टीका केली होती. त्यानंतर जॅक मा हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. अलिबाबा ही 1999 मध्ये सुरू झालेली कंपनी आहे. या कंपनीचा रिटेल, बिझनेस टू बिझनेस, ग्राहकापासन ग्राहकापर्यंत सेवा आणि वस्तू विक्री करणारे विविध प्लॅटफॉर्म आहेत. कंपनीने वित्तीय सेवा, फिल्म प्रोडक्शन आणि इतर क्षेत्रातही जम बसविला आहे.
हेही वाचा-मिनी टाळेबंदीने सणासुदीत होणाऱ्या वाहन विक्रीवर होणार परिणाम -इक्रा
यामुळे जॅक मा हे सापडले अडचणीत!
गतवर्षी चीनमध्ये ५७ वर्षीय जॅक मा हे सर्वाधिक श्रीमंत होते. त्यांचा यंदा चौथा क्रमांक आला आहे. दरम्यान, माध्यमातील वृत्तानुसार जॅक मा यांनी २३ ऑक्टोबर २०२० मध्ये चीनच्या नियामक संस्थेवर टीका केली होती. त्यानंतर अँट ग्रुपच्या आयपीओवर चीनकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनच्या नियामक संस्थेने अँट ग्रुपवर कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. मा हे अचानक माध्यमामधून काही महिने गायब झाले होते. त्यानंतर जानेवारीमध्ये त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. जॅक मा यांच्या संपत्तीत घट झाली असली तरी त्यांचा सामाजिक प्रभाव वाढत असल्याचे हरुणने अहवालात म्हटले आहे.