नवी दिल्ली - निस्सान इंडियाने निस्सान आणि डॅटसनसह सर्व श्रेणीमधील मॉडेलच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या किमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी वाहनांच्या किंमत वाढविण्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, वाहनांच्या सुट्ट्या भागांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गेल्या महिन्यात आम्ही ही दरवाढ सहन केली आहे. मात्र, त्यानंतरही दरवाढ सुरू राहिल्याने निस्सान आणि डॅटसन मॉडेलच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत. असे असले तरी भारतीय ग्राहकांना मूल्यांप्रमाणे उत्कृष्ट उत्पादने देत आहोत.
निस्सान मॅग्नाईट या नवीन मॉडेलचे देशातील निस्सान इंडियाच्या डीलरशीप आणि वेबसाईटवर केवळ ११ हजार रुपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे. वेबसाईटवर बुकिंग करता येताना ग्राहकांना संपूर्णपणे डिजीटल अनुभव घेता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-कर्जफेडीवरील मुदतवाढीला ३१ ऑगस्ट २०२० पेक्षा जास्त वाढ नाही -सर्वोच्च न्यायालय
निस्सानचे देशात दोन ब्रँड-
निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लि. (एनएमआयपीएल) ही निस्सान मोटर कंपनी लि. जपानची उपकंपनी आहे. निस्सानची हॅचबॅक, एमयूव्ही, एसयूव्ही आणि सेडान श्रेणीत वाहने उपलब्ध आहेत. निस्सानने रिनॉल्टबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून चेन्नईमद्ये संशोधन आणि विकास तसेच उत्पादन कारखाना स्थापन करण्यात आला आहे. निस्सानचे भारतामध्ये निस्सान आणि डॅटसन हे दोन ब्रँड आहेत.
हेही वाचा-बँकांच्या अर्जाकरता आरबीआयकडून तज्ज्ञांची मूल्यांकन समिती स्थापन
नुकतेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार निस्सानच्या २,४४७ वाहनांची फेब्रुवारीमध्ये विक्री झाली आहे. निस्सानचा वाहनांचा बाजारपेठेत १ टक्के हिस्सा आहे.