पुणे - कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या शेतीतून उद्योगाची कास धरणाऱ्या सतीश खैरे या उच्चशिक्षित तरुणाने अनेक तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. देशी गायींच्या संगोपनातून खैरे हे कुटुंब दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करते. त्याला पुण्याच्या बाजारपेठेतही ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मागील दोन वर्षांपासून शिरुर तालुक्यातील शिरुर-पाबळ रस्त्यावरील खैरेवाडी चर्चेत आली आहे. कारण सतीश मोहन खैरे या उच्चशिक्षित तरुणाने (DME,PGD in BM,MBS) लक्ष्मीगीर गोशाळेच्या यशाने!
सतीश यांचे ६ चुलत्यांचे एकत्र कुटुंब आहे. उच्चशिक्षण घेऊन आणि १४ वर्ष नोकरी केल्यानंतर या तरुणाने अचानकपणे आपला मार्ग बदलला. कमी पाऊस असलेल्या या परिसरात त्याने आपली गोशाळा उभारली आणि पुण्यात "नॅचरल वर्ड" हे आउटलेट सुरु केले आहे.
दोन वर्षांपूर्वी सतीश यांनी २ गाईंपासून सुरु केलेल्या देशी गाईंच्या गोठ्यात आज ८२ गाईचा सांभाळ केला जात आहे. गोठा उभारणी आणि गाई खरेदीसाठी त्यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता कुटुंबियांच्या मदतीने २ एकर क्षेत्रावर भव्य असा मुक्त गोठा उभारला आहे.
त्यांच्या गोठ्यातील गायींचे संगोपन आणि वैद्यकीय उपचार घरच्या घरीच केले जातात. यासाठी सतीश यांचे चुलते बाळासाहेब खैरे आणि चुलती नंदा खैरे सर्व व्यवस्था पाहतात. नैसर्गिक दुधासोबत अलीकडे त्यांनी गाईच्या दुधापासून तूप,पनीर, दही तर शेण- गोमूत्र पासून जीवामृत,पंचगव्य,फेसवॉश,दंतमंजन इत्यादी उत्पादने घरच्या घरी बनवण्यास सुरुवात केली आहे.
विषमुक्त अन्न आणि विषमुक्त पर्यावरण देणाऱ्या गोशाळेतून त्यांनी पुण्यासारख्या बाजारपेठेत आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. स्वतःच्या शेतीकडे पाठ करून नोकरी शोधणाऱ्या तरुणांना ही यशाची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.