हैदराबाद - सिरम संस्थेकडून तयार करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या लसीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच सिरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी कोरोना लसीबाबत केंद्र सरकारच्या आर्थिक तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या लसीसाठी सरकारकडे ८० हजार कोटी रुपये तयार आहेत का, असा प्रश्न आदार पुनावाला यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाच्या लसीची खरेदी आणि वितरणाची योजना आखली आहे. कोरोनाच्या लसीचे उत्पादन करण्यासाठी सिरममने ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदार पुनावाला यांनी ट्विट करत केंद्र सरकारला लसीच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारत सरकार हे कोरोनाच्या लसीसाठी ८० हजार कोटी रुपये पुढील वर्षी उपलब्ध करणार आहे का? कारण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला ही लस खरेदी करून संपूर्ण भारतात वितरित करावी लागणार आहे. हे आपल्यापुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
हेही वाचा-'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूट सज्ज!
आदार पुनावाला यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले, की मी हा प्रश्न विचारतो, कारण आम्हाला नियोजन आणि मार्गदर्शनाची गरज आहे. देशातील आणि विदेशातील कोरोना लसीचे उत्पादक हे देशात लसीचे वितरण करणार आहेत. सिरमने कोरोनाच्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी घेण्याची सोमवारी घोषणा केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केली आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
हेही वाचा-केईएम रुग्णालयात शनिवारपासून सिरम-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची चाचणी