नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सेवा सुरू करण्याबाबत भारत जुलैमध्ये निर्णय घेणार असलयाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. हा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्था आणि विविध राज्य सरकारला विश्वासात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते जीएमआर ग्रुपने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, की अनेकदा मला आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा कधी सुरू शक्य आहे, असा विचारण्यात येते. जर तुम्ही तो प्रश्न माझ्यावर सोडला तर, जर सर्व व्यवस्था सुरू राहिली तर आणि कोरोना विषाणुच्या वर्तणुकीचा अंदाज करता आला तर पुढील महिन्यात विमान सुरू करायला पाहिजे. मात्र, हा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालय घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिणेतील काही राज्यांमध्ये टाळेबंदी काढल्यानंतर पुन्हा लागू करण्यात आल्याचे आपण पाहिले. तसेच काही देशांतही घडत आहे. हे होवू नये, याचा प्रयत्न करत असल्याचे हरदीप सिंग यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन महिने देशांतर्गत विमान सेवा बंद ठेवण्यात आली होती. देशांतर्गत 25 मे पासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमान सेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.