वॉशिग्टंन- अमेरिकेत रोजगार मिळविण्याकरता विदेशी नागरिकांकडून घेण्यात येणाऱ्या व्हिसामधील फसवणूक टाळण्याकरता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध पावले उचचली आहे. यामध्ये एच-1बी व्हिसाची निवड प्रक्रिया बदलण्याचा समावेश आहे. याच व्हिसाचा उपयोग करून भारतीय आयटी अभियंते अमेरिकेत नोकऱ्या मिळवित असतात.
एच1बी व्हिसामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना विदेशातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नोकरी देण्याची परवानगी मिळते. त्यामधून कर्मचाऱ्यांना अमेरिकत राहण्याचा तात्पुरता परवाना मिळतो. बहुतांश तंत्रज्ञानामधील कंपन्यांकडून दरवर्षी भारत आणि चीनमधील दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते.
अमेरिका नागरिकत्व आणि स्थलांतरित सेवा (युएससीआयएस) विभागाने एच1बी व्हिसाच्या नियमात सुधारणा केल्या आहेत. त्यामागे अमेरिकेतील कामगार आणि उद्योजकांचे हित जोपासणे हा हेतू आहे. ही माहिती युएससीआयएसचे उपसंचालक जोसेफ एडलो यांनी अमेरिकेच्या संसदेत दिली. तर एच-1बीसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थानिक कामगारांना मदत करण्यासाठीही शुल्क द्यावे लागणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेमधून मास्टर्सची पदवी अथवा त्याहून अधिक शिक्षण घेतल्यास त्यांना एच1बी व्हिसामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अमेरिकेकडून दरवर्षी 65 हजार एच 1बी व्हिसा देण्यात येतात. यापूर्वी अमेरिकेने व्हिसाच्या संख्या मर्यादित केल्याने आयटी कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली होती.