सॅनफ्रान्सिस्को - ट्विटर या समाजमाध्यम कंपनीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जगभरातील एकूण मनुष्यबळात महिलांचे ५० टक्के प्रमाण ठेवण्याचे ट्विटरने उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट २०५०पर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याचे ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
ट्विटरच्या जागतिक मनुष्यबळात महिलांचे एकूण प्रमाण ४२.२ टक्के आहे. जगभरात ब्लॅकलाइव्ह्जमॅटर हा हॅशटॅग ट्रेडिंग असताना ट्विटरने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अमेरिकेतील एकूण मनुष्यबळात २०२५पर्यंत २५ टक्के लोक मागास, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे असणार आहेत. तर त्यामधील एकूण १० टक्के कर्मचारी कृष्णवर्णीय असतील, असे ट्विटरने धोरण निश्चित केले आहे.
ऑगस्टमधील आकडेवारीनुसार अमेरिकेतील ट्विटरच्या मनुष्यबळात ६.३ टक्के लोक हे कृष्णवर्णीय आहेत. याबाबत ट्विटरचे प्रमुख (सर्वसमावेशकता आणि वैविध्य) दलाना ब्रँड म्हणाल्या, की सध्याचे आकडे जास्त नाहीत. मात्र, कृष्णवर्णीय लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यात आम्ही आघाडीवर असणार आहोत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.