नवी दिल्ली - जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांकरिता आनंदाची बातमी आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ११,२५० रुपयांनी कमी केली आहे. केंद्र सरकारकडून फेम -२ योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे कंपनीने ही किंमत कमी केली आहे.
आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत दिल्लीत १,००,७७७ रुपये असणार आहे. यापूर्वी या स्कूटरची किंमत १,१२,०२७ रुपये होती. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकरिता अनुदान देणारी योजना फेम-२ ची घोषणा केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांना अधिक सवलत मिळणार आहे.
हेही वाचा-नाशिक : पाकच्या कांद्याने केला भारतीय कांद्याचा 'वांदा'; निर्यातीत 70 टक्के घट
ही आहे इलेक्ट्रिक वाहनांकरिता योजना
मागील आठवड्यात केंद्र सरकारने फेम इंडिया -२ (फास्टर अडोप्शन अँड मॅन्युफॅक्च्युअरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हिकल्स इन इंडिया फेज २) सुधारित योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढविण्याकरिता १५ हजारापर्यंत सवलत जाहीर केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून १० हजारापर्यंत सवलत देण्यात येत होती. ही सवलत हायब्रीड बस वगळता सर्व हायब्रीड वाहनांकरिता असणार आहे. नुकतेच अवजड उद्योग विभागानेही इलेक्ट्रिक वाहनांना ४० टक्क्यापर्यंत सवलत जाहीर केली आहे. त्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांना २० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येत होती.
हेही वाचा-सोने-चांदी खरेदी करणार आहात... थांबा!!! जाणून घ्या नवीन नियम, कायदे... त्यांचे फायदे
इंधन दरवाढीने इलेक्ट्रिक दुचाकींची वाढली मागणी
इंधनाच्या वाढत्या किंमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. पेट्रोलचे दर हे शंभरीवर पोहोचले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोलवर चालणारी वाहने चालवणे अवघड झाले आहे. याला पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक वळत आहेत. काही दिवसांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मोठी मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.