नवी दिल्ली - नववर्षात दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) प्रेक्षकांना भेट ठरावी, असा निर्णय घेतला आहे. ट्रायने केबल आणि प्रसारण वाहिन्यांसाठी असलेल्या नियमात बदल केले आहेत. या नव्या बदलामुळे ग्राहकांना कमी पैशात अधिक प्रसारण वाहिन्या पाहणे शक्य होणार आहे.
डीटीएच सेवेवर सुमारे ५०० मोफत प्रसारण वाहिन्या आहेत. या सर्व मोफत प्रसारण वाहिन्यांसाठी डीटीएच कंपन्यांना जास्तीत जास्त १६० रुपये आकारता येणार आहेत. सध्या १०० मोफत प्रसारण वाहिन्यांसाठी सुमारे १५४ रुपये आकारण्यात येतात. काही ग्राहक घरातील दोन दूरसंचासाठी दोन केबल सेवा घेतात. या दुसऱ्या केबल जोडणीसाठी (नेटवर्क कॅपिसिटी फी) जास्तीत जास्त ४० रुपये कंपन्यांना ग्राहकांकडून घेता येणार आहेत. तर दुसऱ्या दूरसंचावरील केबल सेवेसाठी असलेले दर कमी करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या केबल सेवेवरील २०० प्रसारण वाहिन्यांसाठी जास्तीत जास्त १३० रुपये (कर वगळता) ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.
हेही वाचा-इंटरनेट डाटाचे किमान दर ठरवा; दूरसंचार कंपन्यांची ट्रायला विनंती
डीटीएच कंपन्यांना (डिस्ट्रीब्युटिशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स) सहा महिन्याच्या पॅकवर शुल्क आकारताना सवलत देण्याची ट्रायने परवानगी दिली आहे. सध्या डीटीएच कंपन्यांकडून केवळ वार्षिक शुल्कावर सवलती देण्यात येतात. ज्या प्रसारण वाहिन्यांचे शुल्क १२ रुपये किंवा त्याहून कमी आहे, अशा वाहिन्यांचाच पॅकमध्ये समावेश करता येणार आहे. त्यामुळे १२ रुपयाहून अधिक पॅक असलेल्या वाहिन्या ग्राहकांना स्वंत्रपणे घेता येणार आहेत. ट्रायचे नवे दर १ मार्चपासून लागू होणार आहेत.