सॅनफ्रान्सिस्को – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 45 दिवसानंतर टिकटॉकला अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी बंदी लागू करणारे कार्यकारी आदेश काढले आहेत. त्यामुळे तिळतापड झालेल्या टिकटॉक कंपनीने थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कार्यकारी आदेशामुळे धक्का बसल्याचे टिकटॉकने म्हटले. टिकटॉकने ट्रम्प यांच्या आदेशावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले, की कार्यकारी आदेशांचा वापर करताना कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आम्हाला आणि आमच्या वापरकर्त्याला योग्य वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर ते प्रशासनाकडून झाले नाही, तर अमेरिकेच्या न्यायालयाकडून होईल, असे टिकटॉकने म्हटले आहे.
असे आहेत कार्यकारी आदेश-
ट्रम्प यांनी चीनची कंपनी बाईटडान्सशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात व्यवहार करण्यास बंदी केली आहे. टिकटॉकमुळे देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे.
टिकटॉकच्या वापरकर्त्यांचा डाटा चीनचे सरकार हाताळू शकते, असे ट्रम्प प्रशासनाने दावा केला होता. हे आरोप टिकटॉकने वारंवार फेटाळले आहेत. दरम्यान, मायक्रोसॉफ्टकडून टिकटॉकची खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर टिकटॉकच्या वापरातून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने भारतातही टिकटॉकवर बंदी लागू केली आहे.