नवी दिल्ली - तांदळाच्या निर्यातीत जगात अव्वल असलेल्या भारताला चीन काट्याची स्पर्धा देवू लागला आहे. चीनने दक्षिण आफ्रिकेत तांदळाची निर्यात वाढविली आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका ही भारताची तांदूळ निर्यातीची आजवरची सुरक्षित बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे.
धोरणकर्ते सरकार आणि तांदळाचे निर्यातदार चीनच्या तांदूळ निर्यातीकडे सावधपणे पाहत आहेत. चीन हा तांदळाचा आजपर्यंत आयातदार देश आहे. मात्र, चीनने दक्षिण आफ्रिकेत तांदळाची निर्यात वाढविली आहे. चीनच्या तांदळाची किंमत ही भारतीय तांदळाहून खूप कमी आहे. येत्या काही दिवसात निर्यातीची परिस्थिती कशी बदलते हे पाहावे लागेल, असे कृषी निर्यात विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेसांगितले.
हेही वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण : रतन टाटा यांची सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका
गेल्या सहा महिन्यात चीनने सरकारी गोदामामधील ३० दशलक्ष टन तांदूळ हा खुला केला आहे. तर मोठ्या प्रमाणात दक्षिण आफ्रिकेत तांदूळ निर्यात केल्याचे म्हटले जात आहे.
भारतामधून बिगर बासमती तांदूळ प्रति टन ४०० डॉलरने निर्यात करण्यात येतो. मात्र, चीनकडून कमी दरात तांदळाची निर्यात होत असल्याचे लक्ष्य अग्रवाल यांनी सांगितले. ते उत्तराखंडमधील आघाडीचे तांदूळ निर्यातदार आहेत.
हेही वाचा-'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार २० हजार रुपयापर्यंत कॅशबॅक
बाजारातील सूत्राच्या माहितीनुसार, चीनमधून तांदूळ प्रति टन ३०० ते ३२० डॉलर या भावाने निर्यात करण्यात येतो. भारत आणि चीनमधून निर्यात होणाऱ्या तांदळाच्या किमतीत लक्षणीय फरक आहे. त्यामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीवर दीर्घकाळासाठी परिणाम होवू शकतो, अशी अग्रवाल यांनी भीती व्यक्त केली. चालू वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ३५.७८ टक्के घसरण झाली आहे. अपेडामधील सूत्रांच्या माहितीनुसार चीनने जुना तांदूळ आफ्रिकेच्या बाजारपेठेत निर्यात करण्याचे नियोजन केले आहे.