नवी दिल्ली - इंटरनेट डाटाचा किमान दर निश्चित करावा, अशी विनंती दूरसंचार कंपन्यांची संस्था असलेल्या सीओएआयने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) केली आहे. तीव्र स्पर्धेमुळे कोणतीही कंपनी स्वत:हून किमान दर निश्चित करण्याच्या स्थितीत नाही, असे सीओएआयने म्हटले आहे.
रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने इंटरनेट डाटाच्या किमती नियंत्रणात स्थिर ठेवण्यासाठी सहमती दाखविली आहे, असे पत्र सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक राजन एस. मॅथ्युज यांनी ट्रायला लिहिले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दूरसंचार कंपन्यांमध्ये इंटरनेट डाटाचे दर निश्चित करण्यावरून मतभेद होते.
हेही वाचा-सुंदर पिचाईंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा; अल्फाबेटच्या सीईओपदी नियुक्ती
भारती एअरटेल, जिओ आणि आयडिया-व्होडाफोन कंपन्यांचा एकूण ९० टक्के दूरसंचार बाजारपेठेत हिस्सा आहे. या तिन्ही कंपन्यांनी रिचार्जचे दर ५० टक्क्यांहून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीवरून युद्ध सुरू असताना गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच दूरसंचार कंपन्यांनी दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील इंटरनेट डाटाचे दर विकसित आणि विकसनशील देशांतील डाटा दरांहून ५० टक्क्यांनी कमी आहेत.
हेही वाचा-नव्या वर्षात चारचाकी महागणार; मारुती सुझकीपाठोपाठ टाटा मोर्टसही किमती वाढविणार