नवी दिल्ली - मुंबईकरांना शुद्ध पाणी विकत घेण्याची गरज नाही. कारण नळामधून येणारे पाणी भारतीय नियामकाप्रमाणे शुद्ध असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अभ्यासामध्ये आढळून आले. मात्र, इतर कोणत्याही महानगर आणि १७ राज्यांच्या राजधानीमधील पाणी शुद्ध नसल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने पाण्याच्या शुद्धतेच्या तपासणीसाठी देशातील २० राज्यांच्या राजधानीमधून पाण्याचे नमुने घेतले. यामध्ये मुंबईमधील पाण्याचे १० नमुने सर्व गुणवत्तेचे निकष पूर्ण करत असल्याचे आढळून आले. मुंबईवगळता इतर सर्व शहरे हे निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे आढळून आले.
हेही वाचा - रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास अहवाल जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, जलवाहिनीमधील पिण्याचे पाणीही शुद्धतेचे निकष पूर्ण करणारे असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे बंधनकारक नाही. परंतु, तसे करणे बंधनकारक झाल्यास आम्ही कारवाई करू, असे पासवान यांनी सांगितले.
हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १.११ टक्के तर आयातीत १६.३१ टक्क्यांची घसरण
काय म्हटले आहे अभ्यास अहवालात ?
- दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई शहरांमधील पिण्याचे पाणी भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) ११ निकषांपैकी १० निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.
- विविध १७ राज्यांच्या राजधानीमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले.
- दिल्लीमधून घेण्यात आलेले सर्व ११ नमुने गुणवत्तेचे निकष पूर्ण करणारे नव्हते.
- जलवाहिनीमधील पाणीही पिण्यासाठी सुरक्षित नाही.
- चेन्नईमधील १० नमुने ९ निकष पूर्ण करण्यात असमर्थ ठरले आहे. तर कोलकातामधील ९ नमुने हे १० निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले.
बीआयएसचे संचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले, ईशान्येकडील राज्ये आणि १०० स्मार्ट सिटीमधील पाण्याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. ही चाचणी १५ जानेवारी २०२० घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. तर चौथ्या टप्प्यात देशातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणांवरील पाण्याचे नमुने घेण्याचे प्रस्तावित आहे. हे पाणी चाचणीचे निकाल १५ ऑगस्ट २०२० ला जाहीर होणे अपेक्षित आहे.