नवी दिल्ली - अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) पुन्हा एकदा ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात शड्डू ठोकले आहेत. काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या इच्छेपुढे सरकारने झुकू नये, असे सीएआयटीने म्हटले आहे. ई-कॉमर्स कंपनी छोटी अथवा मोठी असली तरी त्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे नोंदणी बंधनकारक असावी, असे सीएआयटीने सूचविले आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांच्या अनुचित व्यापार पद्धतीविरोधात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी कारवाई करावी, अशी सीएआयटीने मागणी केली आहे.
ई कॉमर्स कंपन्या भविष्यातील व्यवसायाची रचना करत आहेत. मात्र त्यांच्या अनुचित व्यापारी पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात व्यसायाची हानी होत आहे. त्यामधून क्षेत्रामध्ये असमानता आणि अयोग्य अशी स्पर्धा निर्माण होत असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
सरकारने अनुचित पद्धतीला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच योग्य स्पर्धा होण्यासाठी पावले उचलावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.