मुंबई - सरकारी बँकाकडील अनुत्पादक मालमत्ता ( एनपीए) वाढत असल्याने बँकापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने १० बड्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कर्जबुडव्यांकडे एसबीआयचे १ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत.
कर्जबुडव्यामध्ये औषधी कंपन्या, जेम्स आणि ज्वेलरी, उर्जा, पायाभूत क्षेत्र आणि इतर क्षेत्रांतील कंपनी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतची जाहीर नोटीस मुंबईतील एसबीआयच्या कॅफे परेडवरील स्ट्रेस्ड असेट्स मॅनेजमेंट शाखेने काढली आहे. कर्जबुडव्यामधील बहुतांश लोक हे मुंबईमधील रहिवासी आहेत. कर्ज फेडण्याबाबत त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाने सातत्याने नोटीस पाठविल्या आहेत.
जर मुद्दल आणि त्यावरील व्याज १५ दिवसात फेडले नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा एसबीआयने कर्जबुडव्यांना इशारा दिला आहे.
या कर्जबुडव्यांनी विदेशात केेला आहे पोबारा-
स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोट्यवधी रुपये बुडवून किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या हा इंग्लंडमध्ये पळून गेला आहे. तर नीरव मोदी हा हिरे व्यापारी व त्याचा मामा मेहूल चोक्सी पंजाब नॅशनल बँकेची १२ हजार कोटींहून अधिक फसवणूक करून इंग्लंडमध्ये पळून गेले आहेत. हे बँकांने पैसे बुडवून विदेशात पळून गेले असताना त्यांच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारला सध्या मोठी कसरत करावी लागत आहे.