मुंबई - देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात सर्व प्रकारच्या मुदत ठेवीवर लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे.
सातत्याने घसरणारे व्याजदर आणि चलनाची तरलता अधिक आहे. अशा स्थितीमध्ये एसबीआयकडून रिटेल टर्म डिपॉजिट्स (२ कोटी रुपयाहून कमी) आणि बल्क टर्म डिपॉजिट्सवर ( २ कोटी आणि त्याहून अधिक) व्याजदरात कपात करण्यात येणार आहे. किरकोळ मुदत ठेवीवरील व्याजदर हे २० बीपीएसने कमी करण्यात येणार आहेत. तर बल्क म्हणजे मोठ्या रक्कमेच्या मुदत ठेवीवर व्याजदर हे ३५ बीपीएसने कमी करण्यात येणार आहेत.
कमी कालावधीसाठी ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हे ५० ते ७५ बीपीएसने कमी करण्यात येणार आहेत. यामध्ये १७९ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवीचा समावेश आहे. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेच्या साईटवर उपलब्ध असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.