मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याज दरात ३० बेसिस पाँईटने कपात केली आहे. तर गृहकर्ज घेण्यासाठी लागणारे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.
एसबीआयने सीबील स्कोअरशी संलग्न असलेल्या गृहकर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. यामध्ये ३० लाखापर्यंतच्या गृहकर्जावर ६.८० टक्के तर त्याहून अधिक कर्जाची रक्कम असल्यास ६.९५ टक्के व्याज दर असणार आहे. महिलांना गृहकर्जावर ५ बेसिस पाईंटची सवलतदेखील मिळणार आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेचा 81 टक्क्यांनी वाढला नफा; पहिल्या तिमाहीत मिळवले 4189 कोटी रुपये
कर्जावरील व्याज दर कमी करण्यामागे गृहखरेदी करणाऱ्यांना आकर्षक सवलत देण्याचा उद्देश असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. ग्राहक योनो अॅपवरून गृहकर्जासाठी प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावरून ग्राहकांना व्याज दरात ५ बेसिस पाँईटने सवलत मिळणार आहे.
हेही वाचा-स्टेट बँक ऑफ इंडिया देणार १४ हजार नोकऱ्या; कर्मचाऱ्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती
दरम्यान, कोरोनाच्या काळात स्थावर मालमत्ता क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. स्टेट बँकेने व्याजाचे दर कमी केल्याने स्थावर गृहखरेदीला चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देशातील सर्वात मोठी स्टेट बँक देशात आणखी विस्तार करणार आहे. त्यासाठी सीएमएस इन्फो सिस्टिम्स स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३ हजार एटीएम मार्चपर्यंत सुरू करणार आहे.