तेहरान - इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादल्याने इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली. कठीण परिस्थिती विरोधात राजकीय मतभेद टाळून एक होण्याचे त्यांनी देशवासीयांना आवाहन केले. आर्थिक निर्बंधामुळे १९८० हून अधिक भीषण परिस्थिती होईल, अशी त्यांनी अप्रत्यक्ष भीती व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकने लढाऊ विमाने आणि युद्धनौका गल्फमध्ये तैनात केल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष रौहानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की १९८० ते १९८८ च्या युद्धाहून परिस्थिती चांगली किंवा वाईट आहे, हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र युद्धात बँक, तेल विक्री, आयात आणि निर्यातीची काही समस्या नसते. तेव्हा केवळ शस्त्रास्त्र खरेदीवर निर्बंध होते, असे रौहानी म्हणाले.
आर्थिक निर्बंधाला सामोरे जाता राजकीय एकता दाखविण्याचे रौहानी यांनी आवाहन केले. आपल्या क्रांतीच्या इतिहासात शत्रुनेही कधीही एवढा दबाव वाढविला नव्हता. मात्र मी निराश नाही. भविष्याबाबत आशावादी आहे. अशा कठीण परिस्थितीत एकी दाखविल्यानंतर आपण अडचणींवर मात करू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आण्विक कार्यक्रमामुळे इराण सापडलाय संकटात-
अमेरिका-इराणमधील तणावामुळे २०१५ च्या आण्विक कराराचे भवितव्य अंधारात आहे. या करारावर इराणने आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे पाच कायम स्वरुपी सदस्य आणि जर्मनीबरोबर करार केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये एकतर्फी आण्विक करार रद्द करून इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहे.
ट्रम्प यांनी इराणवरील आर्थिक आणि लष्करी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. या दबावामुळे जगभरातील देशांना इराणकडून तेल आयात करणे अशक्य झाले आहे. नव्या सौद्यानुसार इराण आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवेल, अशी ट्रम्प प्रशासनाला आशा आहे. आर्थिक निर्बंधामुळे २०१९ मध्ये इराणच्या अर्थव्यवस्थेवर ६ टक्के परिणाम होईल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अंदाज वर्तविला आहे.