नवी दिल्ली - टाळेबंदीमुळे भारतीय किरकोळ क्षेत्र अडचणीत सापडले आहे. या क्षेत्राला ६० दिवसात ९ लाख कोटींचा फटका बसल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) दिली आहे.
सीएआयटीच्या माहितीनुसार टाळेबंदीचे नियम शिथील करूनही केवळ ५ टक्के व्यवसाय सुरू झाले आहेत. तर ८ टक्के मनुष्यबळ पुर्ववत कामावर आले आहे. किरकोळ व्यापार क्षेत्राच्या नुकसानीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे सुमारे १.५ लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न बुडाले आहे. सरकारने कोणतीही मदत न केल्याने देशातील व्यापारी वर्ग आर्थिक चणचणीला सामोरे जात आहेत. त्यांना भविष्याबाबत चिंता भेडसावत आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
दिल्लीबाहेरील ५ लाख व्यापारी हे दिल्लीमध्ये येत असतात. मात्र, वाहतूक सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांची दिल्लीमधील खरेदी थांबली आहे. त्यामुळे दिल्लीमधील घाऊक बाजारपेठ आठवडाभर थंड राहिली आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील सात कोटी व्यापारी हे ४० कोटी लोकांना रोजगार देतात. त्यामधून वर्षाला ५० लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्हींनी दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांवरील संकट वाढल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारत मंदीला सामोरे जाणार