मुंबई - कांद्याच्या दरवाढीचा हॉटेलच्या ग्राहकांनाही आर्थिक फटका बसणार आहे. कांद्याचे दर असेच चढे राहिले तर थाळीचे दर वाढवावे लागतील, असे इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याचे दर मुंबईसह उपनगरामध्ये प्रति किलो १६० ते १७० रुपयांवर पोहोचले होते. सध्या मुंबईत कांद्याचे दर प्रति किलो ६० रुपये आहेत. कांद्याच्या किमती मुंबईमध्ये ३० टक्क्यांनी घसरल्या आहेत. आहार संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी म्हणाले, आम्ही कांद्याच्या किमतीवर 'थांबा आणि वाट पाहा' असे आठवडा ते दहा दिवस लक्ष ठेवणार आहोत. पुढे शेट्टी म्हणाले, कांदा पूर्वी प्रति किलो २० रुपये होता. दोन महिन्यात कांद्याचे दर १०० रुपयांहून अधिक झाले होते. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटने कांद्याचा समावेश असलेले पदार्थ कमी केले आहेत. हीच परिस्थिती राहिली तर आम्हाला व्यवसायात टिकण्यासाठी पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत.
हेही वाचा-देशाच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात घसरण
आहार या संघटनेचे मुंबईमधील लहान-मोठे सुमारे ८ हजार हॉटेल सदस्य आहेत. देशात विशेषत: मुंबईमध्ये कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचा अधिक वापर होतो. तसेच सॅलडसह जेवणाबरोबर कांदा ग्राहकांना दिला जातो. मात्र, कांद्याचे दर वाढल्याने बहुतांश हॉटेलमधून मोफत कांदा देणे बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला तर आर्थिक सर्व्हे ३१ जानेवारीला सादर होण्याची शक्यता
केंद्र सरकारने कांदे दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी १ लाख टन कांदा आयात करणार असल्याचे जाहीर केले आहे.