नवी दिल्ली - पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने काहीअंशी दिलासा दिला आहे. पीएमसीच्या ठेवीदारांना खात्यामधून ४० हजार रुपयापर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीमधील घोटाळ्यानंतर निर्बंध लादून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्यातून केवळ २५ हजार रुपये काढता येतात. आरबीआयने ही मर्यादा वाढवून आज ४० हजार रुपये केली आहे.
दरम्यान, पीएमसीच्या घोटाळ्याप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने पीएमसीचे अधिकारी आणि एचडीआयएलच्या प्रवर्तकांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे मूल्य हे ३ हजार ८३० कोटींहून अधिक असल्याचे ईडीने म्हटले आहे.
पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस याच्या नावावर आलेले मुंबई- ठाणे येथील ४ फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. पुण्यात दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल ९ फ्लॅट असल्याची माहिती न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सोमवारी न्यायालयात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वारीयम सिंग यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत १६ ओक्टॉबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पीएमसी बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध काय आहेत -
- पीएमसी बँक खातेदारांवर आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर एका खातेधारकाला एका खात्यात कितीही रक्कम असली तरी केवळ ४० हजार रुपयेच काढता येतील.
- एखाद्या ग्राहकाने पीएमसी बँकेकडून मुदत ठेवीवर कर्ज घेतले असेल तरी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या ठेवीचा वापर बँक ग्राहक करू शकतो.
- पीएमसी बँकेवर आरबीआयने बँकिंग कलम '३५ अ' नुसार निर्बंध लादल्यानंतर पीएमसी बँकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करताना आरबीआयची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यापुढे ६ महिने तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय बँकेला कुठलेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही.
जुन्या कर्जाच्या नुतनीकरणावर आरबीआयने तात्पुरती बंदी आणली आहे. पुढील सहा महिने पीएमसी बँक प्रशासनाला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही.