मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज संपली. यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी रेपो दर हे पूर्वीप्रमाणेच चार टक्क्यांवर कायम ठेवले असल्याचे जाहीर केले. यासोबतच, रिवर्स रेपो दरही ३.३५ टक्के एवढाच कायम ठेवण्यात आला आहे. रेपो रेट कायम ठेवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
अपेक्षित जीडीपी वाढ उणे ७.५ टक्के..
ग्रामीण आणि शहरी भागांमध्येही मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. हा एक चांगला संकेत असल्याचे दास म्हणाले. यासोबतच, २०२१च्या आर्थिक वर्षासाठी अपेक्षित जीडीपी वाढ ही उणे ७.५ टक्के असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. एप्रिल-जुनच्या तिमाहीत विकासदर हा उणे २३.९ टक्के एवढा होता.
दीर्घकालीन आधारावर आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “चालू आर्थिक वर्षात जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत आर्थिक धोरणाच्या अनुकूल भूमिकेस पुढे जाण्याचे आणि पुढील वर्षासाठी टिकाऊ आधारावर वाढीस चालना देण्यासाठी, तसेच कोविड-१९चा परिणाम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे" असेही दास म्हणाले.
हेही वाचा : भारतीय नौदल दिवस : राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा..