हैदराबाद - पेट्रोलच्या किमती देशभरात अनेक ठिकाणी प्रति लिटर १०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. याचा दोष पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या दराला दिला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोलच्या किमती अंशत: घसरण्यास सुरुवात होईल असे सांगितले आहे. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. तसेच उत्पादन कमी झाल्यानेही जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत आहे.
पुढे धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोलियम उत्पादनांचाही जीएसटीच्या कार्यक्षेत्रात समावेश करावा, अशी जीएसटी परिषदेला विनंती करण्यात आली आहे. हा प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या विचाराधीन आहे. त्याचा लोकांना फायदा होणार आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी जीएसटी परिषदेवर असेल, असे पेट्रोलियम मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ३३७ रुपयांनी महाग
काँग्रेसच्या टीकेला पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राजस्थान व महाराष्ट्रमध्ये इंधनावर जास्तीत जास्त कर आहेत, हे सोनियाजी यांना माहित असायला हवे. कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे. रोजगार वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-'५ जी'चे वेध; एअरटेलची क्वाकोम्नबरोबर संयुक्त भागीदारी