मुंबई - टाळेबंदीमुळे उद्योगांकडून कमी झालेली मागणी आणि पावसाने घटलेले तापमान या कारणांनी राज्यातील वीजेच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी महानिर्मितीने कोराडी, नाशिक, परळी व भुसावळ प्रकल्पातील वीज निर्मिती थांबवली आहे. याशिवाय अदानी, जिंदलसह वीजनिर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्यांनी वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.
राज्याच्या अनेक भागात पडलेल्या पावसाने तापमानात घट झाली आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्र व कुलर, पंख्यांंसह कृषिपंपाचा वापरही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी केवळ 13 हजार 987 मेगावॅटवर आली आहे. तर दुसरीकडे टाळेबंदी शिथिल होत असल्याने उद्योग सुरू होत आहे. असे असले तरी अद्यापही सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. त्यामुळेही विजेची मागणी अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही. दरम्यान, महानिर्मितीच्या स्टेड लोड डिस्पॅच सेंटरच्या 1 जुलैच्या दुपारी 12 वाजताच्या स्थितीनुसार राज्यात विजेची मागणी 13, 987 मेगावॅट नोंदवण्यात आली. यापैकी सरासरी ५ हजार मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून मिळत होती, तर महानिर्मितीसह खासगी कंपनी राज्यात ७ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते.
महानिर्मितीकडून चार औष्णिक विद्युत प्रकल्प वगळून खापरखेडा, पारस, चंद्रपूर या तीन प्रकल्पातून 4832 मेगावॅटची निर्मिती केली जात आहे. उरनच्या गॅस प्रकल्पातून १३२ मेगावॅट निर्मिती सुरू आहे. कोयनासह इतर जलविद्युत प्रकल्पातून 247 मेगावॅट तर सौर ऊर्जेपासून 130 मेगावॅट निर्मिती सुरू आहे. विजेची मागणी नसल्याने खासगी कंपन्यांनीही उत्पादन कमी केले आहे. त्यानुसार अदानी 1198 मेगावॅट, जिंदल 793 मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएल-100 मेगावॅट, धारीवाल 165 मेगावॅट अशी वीजनिर्मिती करत आहेत.
१७ वीज निर्मितीचे संच बंद
महानिर्मितीने वीज निर्मिती थांबवलेल्या चार औष्णिक प्रकल्पात एकूण 17 वीजनिर्मिती संच आहेत. यापैकी नाशिक केंद्रात 210 मेगावॅटचे 3 संच आहेत. कोराडी केंद्रात 660 मेगावॅटचे तीन आणि 210 मेगावॅटचे 2संच आहेत. परळीत 250 मेगावॅटचे 3 आणि 210 मेगावॅटचे 2 संच आहेत. भुसावळ केंद्रात 210 मेगावॅटचा 1 आणि 500 मेगावॅटचे 2 संच आहेत.
विजेची मागणी वाढत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या महानिर्मितीसह वीज वितरण करणाऱ्या महावितरण व इतरही खासगी कंपन्यांची चिंता वाढत आहे. महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने लवकरच विजेची निर्मिती वाढून स्थिती सामान्य होण्याची आशा व्यक्त केली आहे