न्यूयॉर्क - अमेरिकन सरकारने व्हेनेझुएलाच्या सरकारची आर्थिक व राजकीय कोंडी करण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतानेही व्हेनेझुएलाच्या कच्चा तेलावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकल पॉम्पेओ यांनी केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांच्याशी त्यांनी या विषयावर चर्चा केली आहे.
व्हेनेझुएलाच्या नागरिकांना धोका असल्याचे मायकल पॉम्पेओ यांनी सांगितले. ते म्हणाले, की मदुराओ यांच्या सरकारला कोणत्याही देशाने आर्थिक संजीवनी देऊ नये, अशी आम्ही मागणी करत आहोत. भारताकडूनही तशीच आम्ही अपेक्षा ठेवत आहोत. यावर परराष्ट्रमंत्री विजय गोखले यांनी काय प्रतिक्रिया दिली, हे सांगण्यास पॉम्पेओ यांनी नकार दिला.
व्हेनुझुएलामधील २०१८ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर तिथे वाद उद्भवला आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या विरोधकांनी ते चुकीचे असल्याची भूमिका मांडली आहे. जानेवारी १० ला व्हेनेझुअलाचे राष्ट्रीय विधीमंडळाचे सभागृह अनधिकृत असल्याचे जाहीर केले. गुआएडो यांनी स्वत:ला हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.
सध्या व्हेनेझुएलाला अन्नासह दैनंदिन वस्तुंची कमतरता भासू लागली आहे. मदुराओ यांनी अमेरिकेतून देशात येणाऱ्या अन्न-धान्याला रोखले आहे. मदुराओ यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याने पॉम्पेओ यांनी क्युबा,रशिया आणि चीनवर टीका केली आहे. क्युबा आणि रशिया हे देश व्हेनेझुएलाच्या लोकशाहीसह तेथील नागरिकांचे हित संपवित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय होणार परिणाम-
भारत हा व्हेनेझुएलाचा प्रमुख तेल आयातदार देश आहे. २०१७-२०१८ मध्ये भारताने ११.५ मिलियन टन कच्चे तेल व्हेनेझुएलामधून आयात केले आहे. गेल्या महिन्यात भारत हा व्हेनेझुएलामधून तेल आयात करणारा सर्वात मोठा देश झाला आहे. भारत हा व्हेनेझुएलामधील उत्पादित होणारे ५५ टक्के तेल आयात करत आहे. अमेरिका व्हेनेझुएलाच्या बँकावर कारवाई करत असल्याने भारताला आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येत आहे. यापूर्वी अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यावर काही देशांना निर्बंध घातले आहेत.