नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी प्रचाराची सोशल मीडियावर रणधुमाळी उडविली आहे. राजकीय पक्षांनी गुगलसह फेसबुकवरील ऑनलाईन जाहिरातीसाठी फेब्रुवारी व मे दरम्यान ५३ कोटी खर्च केले आहेत. ही माहिती फेसबुक व गुगलच्या ऑनलाईन डॅशबोर्डवरून समोर आली आहे.
फेसबुक अॅड लायब्ररी अहवालाच्या माहितीनुसार फेब्रुवारी ते १५ मे दरम्यान १.२१ लाख राजकीय जाहिराती दाखविण्यात आल्या आहेत. त्यासाठी २६.५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर गुगल, यू ट्यूब आणि इतर माध्यमांवर फेब्रुवारी १९ पर्यंत १४ हजार ८३७ जाहिरातींसाठी २७.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सर्वात अधिक भाजपकडून सोशल मीडियावरील प्रचारासाठी खर्च-
सत्ताधारी भाजपने २ हजार ५०० जाहिरातींसाठी ४.२३ कोटी खर्च केले आहेत. या जाहिराती 'माय फर्स्ट व्होट फॉर मोदी', 'भारत के मन की बात' आणि 'नेशन विथ नमो' या पेजवर दाखविण्यात आल्या आहेत. तर गुगलवरील जाहिरातींसाठी भाजपने १७ कोटी रुपये खर्च केले आहेत.
काँग्रेसह इतर पक्षांनी एवढा केला खर्च-
काँग्रेसने फेसबुकवरील ३ हजार ६८६ जाहिरातीसाठी १.४६ कोटी खर्च केले आहेत. तर गुगलवर ४२५ जाहिराती दाखविण्यासाठी २.७१ कोटी खर्च करण्यात आले आहेत. फेसबुकवरील जाहिरातींसाठी तृणमुल पक्षाने २९.२८ लाख रुपये खर्च केले आहेत. आम आदमी पक्षाने १७६ जाहिरातींसाठी १३.६२ लाख रुपये खर्च केले. या जाहिराती फेसबुक पेजवर दाखविण्यात आल्या आहेत. गुगलच्या पॉलिटिकल अॅड डॅशबोर्डवरील माहितीनुसार आपने कॅम्पेनसाठी २.१८ कोटी खर्च केले आहेत.
गुगल आणि फेसबुकने राजकीय जाहिरातींमधील पारदर्शकता दाखविण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.