नवी दिल्ली - खेळणी उत्पादकांनी प्लास्टिकचा कमी वापर करून पर्यावरणस्नेही कच्च्या मालाचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. खेळणी उत्पादकांनी नवसंशोधनावर भर द्यावा, असेही पतंप्रधान मोदी यांनी प्रतिपादन केले. ते पहिल्या 'इंडिया टॉय फेअर २०२१' च्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला खेळणी उद्योगात आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. तसेच जागतिक बाजाराला खेळण्यांचा पुरवठा करावा लागणार आहे. खेळणी उद्योगाची १०० अब्ज डॉलरची बाजारपेठ असताना त्यामधील भारताचा हिस्सा खूप कमी असल्याचे वाईट वाटते. देशामध्ये विक्री होणारी ८५ टक्के खेळणी ही आयात करण्यात आलेली असतात. हाताने तयार केलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी चेन्नापटणम, वाराणसी व जयपूर येथील पारंपारिक खेळणी उत्पादकांशी संवाद साधला. मुलांच्या बदलत्या गरजा ओळखून पारंपारिक खेळणी उत्पादकांनी संशोधन करावे, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला. खेळणी अधिक पर्यावरणस्नेही, आकर्षक आणि नवसंशोधन करून तयार करावीत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
हेही वाचा-ऐन लग्नसराईत जळगावात चांदी दीड हजारांनी तर सोने ५०० रुपयांनी स्वस्त
राष्ट्रीय खेळणी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार
पुढे पंतप्रधान म्हणाले की, खेळण्यांसाठी पुनर्वापर केलेला कच्चा माल वापरावा. देशातील खेळणी उद्योग अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय खेळणी कृती कार्यक्रम तयार करणार आहे. त्यामध्ये १५ मंत्रालयांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. भारतीय खेळणी उद्योगामध्ये परंपरा, तंत्रज्ञान, संकल्पना आणि यशस्वी होण्याची क्षमता आहे. आपण जगााला पर्यावरणस्नेही खेळणी देऊ शकतो, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-तीन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर इंधनाच्या दरात पुन्हा वाढ
दरम्यान, चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा गुजरातमध्ये जुलै २०२० मध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला होता. राजकोटमध्ये उत्पादित होणाऱ्या भारतीय खेळण्यांच्या मागणीत वाढ झाली होती.