नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा पेट्रोलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलचे दर वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 17 पैशांनी वधारून 80.90 रुपये झाले आहे. तर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.
दिल्लीत रविवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर 14 पैशांनी वाढले होते. पेट्रोलचे दर जूननंतर 47 दिवस स्थिर राहिले होते. तर डिझेलच्या किमती जूननंतर सातत्याने वाढल्या होत्या. गेली दोन आठवडे डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.
तेल विपणन कंपनीमधील सूत्राच्या माहितीनुसार जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोलचे दर वाढले आहेत. टाळेबंदी खुली होवूनही ऑगस्टमध्ये देशात डिझेलचा कमी वापर झाला आहे. त्यामधून कोरोना महामारीचा उद्योगावर अजूनही परिणाम राहिल्याचे दिसून आले आहे. नुकतेच खनिज तेलाचा दर प्रति बॅरल 45 डॉलर राहिला होता.