नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने शनिवारी नवा उच्चांक गाठला आहे. सलग चौथ्या आठवड्यात सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ पैशांनी वाढविल्या आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८५.७० रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९२.२८ रुपये आहे. डिझेलच्या किमती वाढून दिल्लीत प्रति लिटर ७५.८८ रुपये आहेत. तर मुंबईत डिझेलच्या किमती वाढून प्रति लिटर ८२.६६ रुपये आहेत. या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १ रुपयाने वाढले आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२१: प्राप्तिकरात दिलासा मिळावा, स्टार्टअपची अपेक्षा
स्थानिक करांनुसार विविध राज्यांत इंधनाचे दर भिन्न आहेत. सध्या राज्यांमध्ये स्थानिक कराचे प्रमाण अधिक आहे. इंडियन ऑईल कंपनी (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) या सरकारी तेल कंपन्यांनी ६ जानेवारीपासून इंधनाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोलचे दर प्रति लिटर १.१९ रुपये तर डिझेलच्या किमती प्रति लिटर २.०१ रुपयाने वाढल्या आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे उद्या होणार हलवा समारंभ; अर्थसंकल्पाची होणार नाही छपाई
ही आहेत पेट्रोल-डिझेल दरवाढीची कारणे-
- कोरोना महामारीवर भारतासह विविध देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. अशा स्थितीत जगभरातून कच्च्या तेलाची मागणी वाढ वाढण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
- सौदी अरेबियाने कच्च्यात तेलाचे उत्पादन कमी केल्याने दर वाढल्याचे म्हटले होते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रोज १ दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांकडून दररोज जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये बदल केले जातात.