नवी दिल्ली - वाहन उद्योगामधील मंदी दिवसेंदिवस गडद होत चालल्याचे चित्र समोर आले आहे. सलग नवव्या महिन्यात जुलैमध्ये वाहन विक्रीत मंदी कायम आहे. चालू वर्षात जुलैमधील प्रवासी वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी कमी झाली आहे.
देशामध्ये जुलैमध्ये विक्री झालेल्या कारची संख्या गतवर्षीच्या तुलनेत ३५.९५ टक्के कमी आहे. ही आकडेवारी वाहन उद्योगांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) दिली आहे.
अशी घटली वाहनांची विक्री-
गतवर्षीच्या तुलनेत दुचाकींची विक्री ही जुलैमध्ये १८.८८ टक्क्यांनी घटली आहे. जुलैमध्ये सर्वप्रकारच्या दुचाकींची विक्री गतवर्षीच्या तुलनेत १६.८२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर व्यवसायिक (कर्मशिअल) वाहनांचीही विक्री गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये २५.७१ टक्क्यांनी घसरली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री जुलैमध्ये १८.७१ टक्क्यांनी घसरली आहे. गतवर्षी २२ लाख ४५ हजार २२३ एकूण वाहनांची विक्री झाली होती. यंदा जुलैमध्ये १८ लाख २५ हजार १४८ वाहनांची विक्री झाली आहे.