नाशिक - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानातील कांदा भारतामधील कांद्याला व्यापारात टक्कर देत आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात 70 टक्के घटली आहे. दरवर्षी 35 ते 40 हजार कंटेनरद्वारे निर्यात होणारा कांदा यंदा केवळ 12 हजार कंटेनर निर्यात झाला आहे.
पाकिस्तानमधील पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. त्याबरोबर कांद्याचा दर्जादेखील चांगला आहे. या कांद्याची किंमत कमी असल्याने पाकिस्तानने कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली आहे. त्याचा परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर झाला आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनच्या प्रति डोसची किंमत १५० रुपये फार काळ शक्य नाही-भारत बायोटेक
पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे तीन हंगामात कांद्याचे उत्पादन
भारतामध्ये तीन हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पाकिस्तानमध्ये यापूर्वी फक्त एकाच हंगामात कांदा उत्पादन घेतले जात होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि मुबलक पाण्यामुळे पाकिस्तानमध्येही दोन हंगामात उत्पादन घेतले जात आहे. पाकिस्तानच्या कांद्याची प्रतवारीदेखील सुधारली आहे. त्यामुळे मलेशिया, थायलंड व श्रीलंका या देशातही पाकिस्तानच्या कांदा निर्यात सुरू झाली आहे. तसेच भारतीय कांद्यापेक्षा 100 ते 150 डॉलर दर कमी असल्याने पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात कमी झाली आहे. भविष्यात पाकिस्तानमधील कांद्याचे उत्पादन वाढल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा-सोने-चांदी खरेदी करणार आहात... थांबा!!! जाणून घ्या नवीन नियम, कायदे... त्यांचे फायदे
भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या कांद्याचे कमी दर
गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मक्तेदारी राहिली आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये कांद्याचे उत्पादन वाढले आहे. भारतापेक्षा त्यांच्या कांद्याचे दर कमी असल्याने भारतातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. तसेच थायलंड, मलेशिया व श्रीलंका आदी भागात कोरोनामुळे पर्यटन कमी झाल्याने कांद्याची मागणी कमी झाल्याचे कांदा निर्यातदार संदीप लुनावत यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे.
श्रीलंकामधील कांद्याचे दर
- भारतीय कांदा 450 डॉलर प्रति टन
- पाकिस्तानी कांदा 310 डॉलर प्रति टन
कांदा साठवणुकीवर भर
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ दक्षिण भारतातदेखील कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा त्याभागात जोरदार पाऊस झाल्यास कांद्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूकीवर भर दिला आहे.