नवी दिल्ली - सण जवळ येत असतानाच कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुरवठा कमी झाल्याने दिल्लीच्या आझादपूर कृषी बाजारात कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. चांगल्या प्रतिच्या कांद्याची घाऊकमध्ये ३० ते ४० किलो दराने विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो ५० ते ६० रुपयाने विकला जात आहे.
आझादपूर कृषी बाजारात बुधवारी ५७ ट्रक (सुमारे १२०० टन) कांद्याची आवक झाली. तर मंगळवारी ३७ ट्रक कांद्याची आवक झाली. येथील विक्रेत्याच्या माहितीनुसार ७० हून कमी ट्रकची आवक झाल्यास मागणीपेक्षा कमी पुरवठा होतो. त्यामुळे काद्यांचे भाव वाढत आहेत. कमी पुरवठा झाल्याने कांद्याचे भाव ऑगस्टमध्ये दुप्पट झाल्याचे कांदे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले.
वेगवेगळ्या प्रकारच्या कांद्याची किंमत भिन्न असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कांद्याचा मोठा साठा केलेल्या व्यापाऱ्यांनी कांदा बाजारात खुला केला नाही तर आणखी किंमत वाढेल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. आणखी किंमत वाढेल या आशेने ते साठा खुला करणार नाहीत, असेही ते म्हणाले. कांद्याचा पुरवठा करणारे महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश राज्याला पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे त्या राज्यातून कांद्याची होणारी आवकही घटल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
आशियामधील कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारात कांद्याचे दर महागले-
नाशिकमधील लासलगावची बाजारपेठ ही कांद्याचे दर बहुतांश निश्चित करते. आशियामधील कांद्याची सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे दर ८० टक्क्यांनी वाढले आहेत. नाशिकच्या घाऊक व्यापाऱ्याने सांगितले, देशातील कांदा साठा कमी झाला आहे. नवा कांदा बाजारात येण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. या कारणाने कांद्याचे दर वाढत आहेत.
कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न-
कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी नाफेडने अतिरिक्त कांद्याचा साठा बाजारात खुला केला आहे. देशामधील कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने निर्यातीवरील अनुदानात १० टक्के कपात केली आहे.