नवी दिल्ली - भारत टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात पोहोचला असताना कार्यालय आणि कामाच्या ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना टाळण्यासाठी आणि कार्यालयात कोरोनाबाधित आढळल्यानंतर अमलात आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
जर कामाच्या ठिकाणी एक किंवा दोन बाधित आढळले तर संपूर्ण इमारत सील करण्याची गरज नाही. संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून पुन्हा तिथे काम सुरू करण्यात येवू शकते. जर कोरोना बाधिताने गेल्या ४८ तासात कार्यालयाला भेट दिली असेल तरच निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया करावी लागेल. मात्र, जर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग असेल तर संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करून ४८ तासांसाठी सील करावी लागणार आहे. जोपर्यंत इमारतीचे निर्जंतुकीकरण होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागणार आहे.
कर्मचाऱ्यांना कार्यालयात शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करून हात धुणे अशा आरोग्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
हेही वाचा-टाळेबंदी ४.० : ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्व वस्तुंच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात
जर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांनी संबंधित राज्य, आरोग्य यंत्रणेला व १०७५ हेल्पलाईन क्रमांकावर कळवावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणा त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची माहिती घेणार आहे. जर एखाद्या कंटेन्टमेंटमधील कर्मचाऱ्याने घरून काम करण्याची परवानगी मागितली तर तशी परवानगी कार्यालय व्यवस्थापनाला द्यावी लागणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, देशात ३१ मे रोजीपर्यंत टाळेबंदी सुरू राहणार आहे.
हेही वाचा-कोरोनाचे संकट : महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या जीडीपीवर होणार ६० टक्के परिणाम