नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटावर मात करताना अर्थव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. अशावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि इतर सदस्यांनी स्वेच्छेने ३० टक्के कमी वेतन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन विवेक देव्रॉय यांनीही वर्षभर ३० टक्के कमी वेतन घेण्याचा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि आर्थिक सल्लागार परिषदेने कोरोनाच्या लढ्याविरोधात सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वर्षभरात ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा : पी अँड जी करणार साडेदहा लाख मास्कचे वाटप
हे पैसे पीएम केअर्सला देण्यात येणार असल्याचेही नीती आयोगाने म्हटले आहे. पीएम केअर्स हा निधी केंद्र सरकारने सार्वजनिक विश्वस्त न्यास अंतर्गत स्थापन केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यासाचे अध्यक्ष आहेत. तर संरक्षण, गृह आणि वित्तीय मंत्री हे सदस्य आहेत.
हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये प्रवासी रेल्वे बंद असूनही सरकारने असे कमविले ७.५ कोटी