चेन्नई – न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीसह इतर कंपन्यांनी एअर इंडियाच्या 170 विमानांना विमा दिला आहे. त्यामध्ये कोझीकोड विमानतळावर अपघात झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचाही समावेश होता. विविध विमा कंपन्यांकडून विमानांना विमा देण्यात आल्याने न्यू इंडिया इन्शूरन्सला मोठा आर्थिक फटका बसणार नसल्याचे उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले.
कोझीकोड विमानतळावरील विमानाच्या अपघातानंतर पुढील आर्थिक वर्षात विमान कंपन्यांसाठी विम्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरियन्टल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून एकत्रिपतपणे विमान कंपन्यांना एकत्रिपणे विमा देण्यात येतो.
या कंपन्यांनी कोझीकोड विमानतळावर अपघात झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या बोईंग 733 विमानाला अपघात विमा दिला होता. हा 50 दशलक्ष डॉलरचा अपघात विमा होता. एअर इंडियाच्या विविध विमानांवरील विम्याची रक्कम वेगेवगळी आहे. एअर इंडियाकडून विमान आणि प्रवाशांसाठी तृतीय पक्षाचा विमा घेण्यात येतो. विमानाचे पूर्ण नुकसान झाल्याने किमतीएवढा दावा एअर इंडियाकडून करण्यात येणार आहे.
एअर इंडियाने चारही कंपन्यांना मिळून 36 दशलक्ष डॉलरचा विमा हप्ता दिला आहे. त्यामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्सला 40 टक्के हप्ता मिळाल्याने तेवढ्याच टक्क्यांची दाव्याची रक्कम द्यावी लागणार आहे. तर इतर तीन कंपन्यांना 60 टक्के विमा हप्ता मिळाल्याने दाव्याच्या 60 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या नियमाप्रमाणे विमा कंपन्यांकडून प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एअर इंडियाने चारही कंपन्यांकडून एकूण 750 दशलक्ष डॉलरचा विमा काढला आहे.
दरम्यान, शुक्रवारी कोझीकोड विमानतळावरील अपघात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. तर वैमानिक व सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे.