सॅन फ्रान्सिस्को - मायक्रोसॉफ्टच्या एका कर्मचाऱ्यांच्या गटाने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी अमेरिकन सैन्याबरोबरील वादग्रस्त कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे. युद्धाने हिंसा घडत असल्याने अमेरिकेच्या सैन्याचे सक्षमीकरण करू नये, असेही पत्रात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांच्या पत्रातील दाव्यानुसार मायक्रोसॉफ्टला ४७९ मिलियन डॉलरचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटानुसार मायक्रोसॉफ्टला अमेरिकन सैन्याला तंत्रज्ञान पुरवावे लागणार आहे. यामध्ये व्हिझ्युल ऑगमेंटेशन सिस्टिम (आयव्हीएसएस) आहे. हे वृत्त अमेरिकेतील एका माध्यमाने दिले आहे. अमेरिकन सैन्याला देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट हे शस्त्रास्त्र तंत्रज्ञान विकिसत करत आहे. या शस्त्रास्त्राने अमेरिकेन सरकारची संरक्षण सिद्धता वाढणार आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांचा विरोध
आम्ही शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी करार केलेला नाही. त्यामुळे आमच्या कामाचा असा वापर का केला जात आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. सत्या आणि नाडेला यांनी शस्त्रास्त्रे विकसित करणारे तंत्रज्ञान थांबवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी पत्रात केली. तसेच कंपनीचे लोकाप्रती बांधिलकी असलेले धोरण स्पष्ट करा, असेही पत्रात म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टचे उद्दिष्ट हे प्रत्येकाचे तसेच संस्थेचे सक्षमीकरण करणे आणि पृथ्वीसाठी चांगल्या गोष्टी करणे असल्याची आठवणही कर्मचाऱ्यांनी करून दिली आहे. समभागधारक आणि कर्मचारी म्हणून आम्हाला युद्धाचा फायदा घेण्याची इच्छा नाही. हिंसा आणि हानी पोहोचविणाऱ्या कृत्यापासून रोखण्यासाठी मायक्रोसॉफ्टने अमेरिकन सैन्याला सक्षम करू नये, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
काय आहे संरक्षण प्रकल्प-
सैन्याला मायक्रोसॉफ्टचे होलोसेन्स या १ लाख रिअल्टी हेडसेटचे वाटप करण्यात येणार आहे. सैन्याला लढाई करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी या हेडसेटचा वापर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प म्हणजे शत्रुला त्याच्यापूर्वी ओळखणे आणि त्यावर कारवाई करणे असल्याचे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याचे मत-
कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेचे आम्ही नेहमीच कौतुक करत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. आम्ही अमरेकिच्या संरक्षण विभागाला तंत्रज्ञान देण्यासाठी बांधील आहोत. यामध्ये अमेरिकेच्या सैन्यदलाबरोबरील कंत्राट असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.