मुंबई - सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत सरकारची कोंडी करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी करणार आहेत.
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी संध्याकाळी पाच वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नव्याने निवडून सभागृहात आलेल्या आमदारांना अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावा, यासाठी फडणवीस यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या विषयी माहिती देताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा अतिशय चांगला उपक्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुस्तक प्रकाशनासाठी वेळ दिला याबाबाबत मी त्यांचे आभार मानतो. या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लिहिली आहे. गेले २५ वर्ष फडणवीस विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांना सभागृहाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच अर्थसंकल्पावरील त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. अर्थसंकल्पातील बारकावे हेरून त्यांनी अनेकदा सत्ताधारी पक्षाला जेरीसही आणले आहे. फडणवीस यांच्या या कौशल्याचा अनेक नवीन आमदारांना लाभ होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाच्या चिंतेचे सावट; देशभरातील अनेक उद्योगांवर परिणाम
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - आधारमुळं खरंच मिळाला 'आधार'; ४ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला
दरम्यान, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला विधानसभेत सादर करण्यात येणार आहेत.