नवी दिल्ली - बंगळुरूमधील स्टार्टअप लाईव्ह स्पेसने एकूण मनुष्यबळातील१५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामुळे कंपनीतील ४५० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीने व्यवसायावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वच विक्री क्षेत्रावर परिणाम झाला आहे. लाईव्हस्पेसलाही असाच अनुभव येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने ४५० कर्मचाऱ्यांना नोकरीमधून कमी केले आहे. पुढील तीन महिन्यांपर्यत हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना आरोग्य विमा सुरुच राहणार आहे. यापूर्वी कंपनीच्या संस्थापकांनी एप्रिलमध्ये वार्षिक वेतन न घेण्याचे जाहीर केले होते.
लाईव्हस्पेस ही कंपनी रमाकांत शर्मा आणि अनुज श्रीवास्तव यांनी २०१५ मध्ये स्थापन केली आहे. या कंपनीमधून वास्तूर (डिझाईन) संरचनाकार, ग्राहक आणि पुरवठादारांना जोडण्यात येते.
हेही वाचा-नोकिया प्रकल्पासह ह्युदांईतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; प्रकल्प केले बंद
नुकतेच, वुईवर्क इंडियाने सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे विविध स्टार्टअपने कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.
हेही वाचा-'मोठ्या उद्योगांसह सरकारकडे एमएसएमई उद्योगांचे ५ लाख कोटी रुपये थकित'