नवी दिल्ली – तुमची एलआयसीची एखादी विमा योजना बंद पडली असेल तर, ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या संकटकाळात जोखीम वाढली असताना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांची विमा योजना (पॉलिसी) रद्द झाली आहे, त्यांना विमा योजनेचे एलआयसी नुतनीकरण करून देणार आहे.
एलआयसीने रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करण्यासाठी 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करता येणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत केवळ उशीराचे दंड शुल्क आकारून विमा योजनेचे नुतनीकरण करून देण्यात येणार आहे. काही पात्र असलेल्या विमा योजनांचे पाच वर्षात नुतनीकरण करता येणे शक्य आहे. त्यासाठी शेवटी भरण्यात आलेल्या विमा हप्त्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे गृहीत धरण्यात येतात. विमाधारकांना दंडाची रक्कम 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे.
ज्या विमाधारकांना कठीण परिस्थितीत विमा हप्ता भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ही मोहीम फायदेशीर आहे. विम्याचे संरक्षण मिळविण्यासाठी जुनी बंद पडलेली विमा योजना सुरू करणे, अनेकांना योग्य वाटते. विमाधारकांना जीवन विम्याचे संरक्षण मिळविण्याच्या इच्छेची एलआयसीला किंमत वाटते, असे कंपनीने म्हटले आहे.