नवी दिल्ली - देशातील प्रत्येक व्यापारी हा 'वोकल फॉर लोकल' आणि 'आत्मनिर्भर भारत'साठी सदिच्छादूत होऊ शकतो, असे मत सीएआयटी संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केले. उद्योगांची संघटना अॅसोचॅमने आणि आयटीसी सनफिस्टने 'आत्मनिर्भर भारत' विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात खंडेलवाल बोलत होते.
वोकल फॉर लोकल या मोहीमेसाठी देशातील किरकोळ व्यापारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे मत अखिल भारतीय व्याापारी संघटनेचे महासचिव (सीएआयटी) प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, की प्रत्येक व्यापारी हा विविध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. १३० कोटींची लोकसंख्या पहिल्यांदा व्यापाऱ्याच्या संपर्कात येते. कोणत्याही गरजेसाठी लोक पहिल्यांदा व्यापाऱ्याच्या संपर्कात येतात. देशात ७ कोटीहून अधिक व्यापारी आहेत. त्यामुळे विविध मोहीम लाँच करण्यासाठी व्यापाऱ्यांचे संपर्क फायदेशीर ठरू शकतात. वोकल फॉर लोकलसह आत्मनिर्भर भारतसारख्या विविध मोहिमेंची देशात गरज आहे. स्थानिक खरेदीचे महत्त्व अनेकांना माहित नाही, याकडे खंडेलवाल यांनी यावेळी लक्ष वेधले.
हेही वाचा-आरबीआयकडून रेपो दर 'जैसे थे'; अर्थव्यवस्था कोरोनाच्या लढ्यात निर्णायक टप्प्यावर
व्यापाऱ्यांना विविध परवाने मुक्तपणे दिल्यास मागणी वाढू शकेल, असे खंडेलवाल यांनी सरकारला सूचविले आहे. ते म्हणाले, की जर उत्पादन करण्याचा उद्योग सुरू करायचा असेल तर २८ प्रकारच्या विविध परवान्यांची गरज लागते. जर २८ प्रकारचे परवाने मिळवावे लागत असतील तर उद्योजक उत्पादनाचे नियोजन कसे करेल? असा प्रश्न खंडेलवाल यांनी यावेळी उपस्थित केला.