नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात अनेक उद्योगांना फटका बसला असताना खादी ग्रामोद्योग आयोगाने चांगलीच प्रगती केली आहे. खादी ग्रामोद्योगाने (केव्हीआयसी) ई-मार्केट या ऑनलाईन पोर्टलमधन ९ महिन्यांत १.१२ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ही माहिती एमएसएमई मंत्रालयाने दिली आहे.
खादीचे ई-पोर्टल ७ जुलै २०२० ला लाँच करण्यात आले. यामध्ये केव्हीआयसीकडून आजपर्यंत १ लाख ग्राहकांना उत्पादने वितरीत करण्यात आली आहेत. या काळात ग्राहकांनी सरासरी ११ हजार रुपयांची खरेदी केली आहे. केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योगाच्या व्यवसायाचे कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, खादी ग्रामोद्योगाला ऑनलाईनची मोठी बाजारपेठ मिळाली आहे. ई-मार्केटिंग ही गेम चेंजर असल्याचे सिद्ध होत आहे. वर्षभरात २०० कोटी रुपयांची उलाढाल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही गडकरींनी म्हटले आहे.
- येत्या पाच वर्षात खादी उद्योग १० हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडणार असल्याचा विश्वास खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे चेअरमन विनय कुमार सक्सेना यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये व्यक्त केला होता.
- स्वेदशी उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने जुलै २०२० मध्ये महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाबरोबर (केव्हीआयसी) करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला (सीएपीएफ) खादी ग्रामोद्योकडून मोहरीचे तेल आदी पुरवठा करण्यात येणार आहे.