नवी दिल्ली – दक्षिण कोरियाची कंपनी किया मोटर्सने वाहन विक्रीत मैलाचा दगड गाठला आहे. किया मोटर्सने केवळ 11 महिन्यात 1 लाख वाहनांची विक्री केली आहे.
किया मोटर्सने एसयूव्हीच्या श्रेणीतील सेल्टोज ही ऑगस्ट 2019 मध्ये भारताच्या बाजारपेठेत सादर केली आहे. हे वाहन आता लोकप्रिय ठरले आहे. केवळ 11 महिन्यांत 1 लाख वाहनांची विक्री करून सर्वात वेगवान व्यवसाय करणारी कंपनी ठरल्याचे किया मोटर्सने म्हटले आहे. कोणत्याही नव्या वाहन कंपनीला एवढ्या कमी वेळेत यश मिळाले नाही.
किया मोटर्स इंडियाचे सीईओ व व्यस्थापकीय संचालक कुखियुन शिम म्हणाले , की आम्ही 2019 मध्ये पहिल्यांदा भारताच्या बाजारपेठेत कार सादर केली. त्यामुळे हे वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. देशातील प्रत्येक कुटुंबात कारचे नाव व्हावे, हे आमचे ध्येय आहे. भारतीय ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आणि त्यांनी स्वीकारल्याने आम्ही उत्साहित झालो आहोत.
केवळ दोन उत्पादनांमधून 1 लाखांचा टप्पा गाठल्याने कंपनीची भारताबद्दलची वचनबद्धता वाढली आहे. किया मोटर्स इंडियाला आजचा दिवस हा अभिमानाचा आहे. सेल्टोज आणि कार्निवलच्या यशानंतर आम्ही आणखी सकारात्मक टप्पा गाठण्याबाबत आशावादी असल्याचे किया मोटर्स इंडियाचे सीईओ शिम यांनी सांगितले.