नवी दिल्ली - खाण्याचे पान अथवा मंदिरामधील प्रसाद अनेक ठिकाणी मिळतो. मात्र केरळच्या तिरुर येथील खाण्याचे पान आणि तामिळनाडूच्या पालानी पंचामृतम येथील प्रसादाला वेगळीच ओळख मिळाली आहे. कारण त्यांना भौगौलिक संकेतांकचा (जीआय) दर्जा देण्यात आला आहे.
दार्जिंलिग टी, तिरुपती लाडू, कँग्रा पेटिंग्ज, नागपूर संत्री, काश्मीर पश्मिरा आदी वस्तुंना यापूर्वी जीआय दर्जा देण्यात आला आहे.
तामिळनाडुमधील प्रसादाला जीआय टॅग-
पालानी पंचामृतम हा धनद्युथपनी स्वामींच्या मंदिरात देण्यात येणारा प्रसाद आहे. हे मंदिर पालानी डोंगरात आहे. हा प्रसाद केळी, गुळ, गायीचे तूप, मध आणि विलायचीपासून तयार करण्यात येतो. हा तयार करण्यासाठी नैसर्गिक पद्धत वापरली जाते. त्यासाठी कोणत्याही कृत्रिम वस्तुंचा वापर करण्यात येत नाही. तामिळनाडूमधील मंदिरामधील प्रसादाला प्रथमच जीआय टॅग मिळाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
केरळमधील तिरुर बिटेल
तिरुर बिटेल म्हणजे केरळच्या तिरुर येथील खाण्याचे पान आहे. हे तिरुर, तनूर, तिरुरंगाडी, कुट्टीप्पुरम, मलाप्पुरम व तेथील पंचायतीमध्ये घेतले जाते. त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्याचा पान मसाल्यात आणि खाण्यासाठी वापर होतो. अपचन व तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो.
मिझोराममधील दोन वस्तुंनाही मिळाला जीआय टॅग-
मिझोराममधील टॉवेलोहपूआन आणि मिझो पुयानचेई या कापडालाही जीआय मिळाला आहे. टॉवेलोहपूआन हे वजनाला मध्यम, चांगल्या दर्जाच्या लोकरीचे असते. हातांनी लोकर विणून हे तयार केले जाते. त्याचा मिझो भाषेत एका जागेवर स्थिर राहतो, मागे येत नाही असा अर्थ होतो. त्याचे संपूर्ण मिझोराममध्ये उत्पादन घेतले जाते.
मिझो पुआनचेई ही रंगीत शाल आहे. मिझोच्या कापड उद्योगात ही शाल सर्वात अधिक रंगीत मानली जाते. तेथील स्त्रियांसाठी हे महत्त्वाचे वस्त्र मानले जाते. लग्नात, सणात तसेच विविध कार्यक्रमात त्याचा वापर होतो. विणकर त्याची कौशल्याने निर्मिती करतात.
काय आहे जीआय टॅग, जाणून घ्या त्याचे फायदे-
जीआय ही विशिष्ट ओळख असलेले मानांकन आहे. ते त्या भागाची ओळख आणि दर्जा दाखविते. जीआय मिळाल्यानंतर इतर भागातील लोकांना त्याचे उत्पादन किंवा दुसऱ्या नावाने उत्पादन घेता येत नाही. तसेच ग्राहकांना अस्सल उत्पादने ओळखणे शक्य होते, असे मत राष्ट्रीय बौद्धिक संपदा संस्थेचे (एनआयपीओ) अध्यक्ष टी.सी.जेम्स यांनी सांगितले. जीआयचा दर्जा मिळाल्याने दुर्गम भागाच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच कलाकार, शेतकरी, विणकर यांना उत्पन्नाचे साधन मिळेल, असेही म्हटले आहे. जीआय मिळाल्याने स्थानिक अस्सल उत्पादनांना सरंक्षण मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना देश-विदेशात चांगली किंमत मिळू शकणार आहे.