बंगळुरू - कर्नाटकमध्ये कॅनरा बँकेच्या एटीममध्ये कर्मचाऱ्याच्या चुकीने एकच गोंधळ उडाला. एटीएममधून १०० रुपयाऐवजी ५०० रुपयांच्या नोटा निघाल्या आहेत. हा प्रकार माहीत होताच ग्राहकांनी सुमारे १.७ लाख रुपये जादा काढून नेले आहेत.
एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याकडून मोठी गल्लत झाली. कर्मचाऱ्यांनी १०० रुपयांच्या ट्रेमध्ये चुकून ५०० रुपयांच्या नोटा भरल्या. त्यानंतर ग्राहकांनी १.७ लाख रुपये एटीएममधून पैसे काढल्याचे कोडगुचे पोलीस अधीक्षक सुमन डी. पेन्नेकर यांनी सांगितले. एटीएमएमधील घोटाळ्याची घटना कोडगू जिल्ह्यातील मडिकेरी या शहरात घडली आहे. मडीकेरी हे बंगळुरूपासून २६८ किलोमीटर अंतरावर आहे. कॅनरा बँकेने पोलिसांशी अद्याप संपर्क साधला नाही. त्यांच्यास्तरावर पैसे मिळविण्यासाठी कॅनरा बँकेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण
ज्या लोकांनी एटीएममधून पैसे काढले आहेत, त्यांची ओळख पटविण्याचा बँक प्रयत्न करत आहे. काही ग्राहकांनी जादा आलेले पैसे बँकेत परत केले आहेत. यामध्ये बँकेची चूक असल्याचे त्या ग्राहकांनी सांगितले आहे. मात्र, दोनच ग्राहकांनी ६५ हजार रुपये काढून नेले आहेत. त्या ग्राहकांकडूनही पैसे बँक घेणार असल्याचे पेन्नेकर यांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
हेही वाचा-'या' मालमत्तेत भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढविली गुंतवणूक