मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने जम्मू आणि काश्मीर बँकेची लीड बँक म्हणून जम्मू आणि काश्मीरसाठी नियुक्त केली आहे. तर आरबीआयने लडाखसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची नियुक्ती केली आहे.
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरची पुनर्रचना करणारे राजपत्र ९ ऑगस्ट २०१९ रोजी काढले होते. त्यामध्ये लडाख व जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून ३१ ऑक्टोबर २०१९ पासून अस्तित्वात येणार असल्याचे आदेशात म्हटले होते. त्यामुळे केंद्र शासित प्रदेशासाठी आघाडी बँक संयोजक (लीड बँक कन्व्हेनर) नेमण्याचा निर्णय घेतल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय इतर राज्यांसाठी व केंद्रशासित प्रदेशांसाठी असलेल्या लीड बँकेत बदल करण्यात आला नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले.
हेही वाचा-'अल्पबचत योजनांचे व्याज दर बाजाराशी संलग्न करा'
काय आहे लीड बँक योजना
भारतीय रिझर्व्ह बँकेने लीड बँक योजना कार्यान्वित केलेली आहे. देशामधील १७ वाणिज्य बँकांची लीड बँक म्हणून आरबीआयने नियुक्ती केलेली आहे. या बँका राज्यांच्या पतपुरवठा उद्दिष्टात महत्त्वाची भूमिका बजावतात.
हेही वाचा-खनिज तेलाच्या दराचा गेल्या तीन महिन्यातील उच्चांक; प्रति बॅरल ६७ डॉलर!