नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने हवाला रॅकेट चालविणाऱ्या आरोपींच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये टाकण्यात आल्या आहेत. यामधून ५.२६ कोटी रुपयांची रक्कम व दागिने जप्त करण्यात आली आहेत.
बनावट बिलांचा वापर करून मोठ्या प्रमाणात हवालासारखे नेटवर्क चालविण्यात येत होते. धाडीदरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २.३७ कोटी रुपये जप्त केले आहेत. तर २.८९ कोटी रुपयांचे दागिने हे विविध १७ बँकांच्या लॉकरमधून जप्त केले आहेत. अजूनही आरोपींच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. या धाडीमधून हवालाचे नेटवर्क चालविणारे, मध्यस्थ, रक्कम हाताळणारे हे उघडकीस आले आहेत.
बनावट कंपन्यांची स्थापना करून करचुकवेगिरी-
अनेक बनावट कंपन्या हवाला रॅकेट चालविणाऱ्यांकडून स्थापन करण्यात आल्या होत्या. करचुकवेगरी टाळण्यासाठी कंपन्यांमधील कर्मचारी, सहकारी यांना बनावट संचालक आणि भागीदार म्हणून दाखविण्यात येत होते. सर्व बँक खात्यांचे हवाला रॅकेट चालविणाऱ्यांकडून नियंत्रण करण्यात येत होते. आरोपींनी विविध शहरांमधील स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. तर त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी आहेत.